हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१२

अहंकार


कुणाकुणाचे किती त-हांचे अहंकार हे...
मीपण जैसे श्वासांमध्ये भरले आहे!

असतो गर्भ श्रीमंती चा गर्व कुणाला
कुणी आठवे गरीबीतल्या बालपणाला

दर्प कुणाच्या वक्तव्याला कर्तृत्वाचा
दानशूर फडकवतो झेंडा दातृत्वाचा

पीळदार स्नायूंचे करतो कुणी प्रदर्शन
मंडप बांधे कुणी बसाया करण्या अनशन

कुणी गर्जते नाव गुरूंचे अभिमानानेi
नास्तिक कोणी खवळे बुद्धीच्या जोमाने

हात जोडले अखेर एका थोर महंता...
अहंकार नसल्याची होती त्यास अहंता !!

- निलेश पंडित
७ सप्टेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा