हा ब्लॉग शोधा

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

वणवा

आपण सर्व
लाकुडतोड्यांच्या वस्तीत राहणारे
कधी लावतो शेकोटी
पाहतो कधी वणवेही
अकस्मात पेटणारे

आज काय झालं
कळलंच नाही...
तू आलीस घेऊन
पणती तेवती
संधीप्रकाशात
मी स्वच्छ करताना
जुनी निस्तेज समई
आणि तुझ्या पणतीवर
प्रकाशमान केल्यास
माझ्या समईच्या दाही वाती
त्या दाही वातींनी
उजळले आपले दोघांचे चेहरे
उजळल्या दाही दिशा...
...उजळल्या
माझ्या घरातील सर्व भिंती

त्या भिंतींवर दिसल्या
भल्या मोठ्या सावल्या
आपल्याच...
...आपल्यालाच घाबरवणा-या

सांभाळ गं
वेळीच सांभाळ
तुझ्या पणतीने
पेटू शकतात
समया...
शेकोट्या...आणि
वणवेही...

- निलेश पंडित
२० ऑक्टोबर २०१२

२ टिप्पण्या:

  1. अस्सल कवितेचा एक आदर्श घालून दिलात .. कृपया ह्या कवितेचा अर्थ सांगत बसण्याच्या भानगडीत पडू नका... हिचे बहुआयामीपण टिकवून ठेवा!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद...आणि मान्य श्रीधरजी. खरं तर एखाद्या वृत्तबद्ध कविते पेक्षा अधिक गर्भितार्थ पोटात जन्माला घेऊन आली असेल तरच ती खरी मुक्त छंदातील कविता....आणि अशा वेळी हा गर्भितार्थ वाचकाच्या दृष्टीचे संस्कार होऊन विशाल होणं हे अधिकच छान. तसं होत असताना मी स्पष्टीकरण देणार नाही!!

      हटवा