हा ब्लॉग शोधा

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१२

सर्ग


देश बदलला
बदलला समाज
लोटली किती युगं !
आयुष्यातही उलटले
सर्गांमागून सर्ग

पण हे भेसळयुक्त मिश्रण...
वर्गांमधले, वर्गांखाली, वर्गांबाहेर
कित्येक वर्ग...
कधी संपणार?
का नेहमीच आपण
रेनडियरच्या गाड्यांना
बैलांचे - कुत्र्यांचे तांडे जुंपणार !

मऊसूत तलम कांतीचे सज्जन
त्वचेला उन्हाचा स्पर्श न होता
स्वच्छ सुस्पष्ट बोलत
हात जोडून
ओठ दुमडून
लीनतेने...नम्रतेने
घाम गाळण्याची
करतात प्रार्थना....!
हिरे आणि सोनं, नाणं
तिजोरीत भरताना

...आणि त्या प्रार्थना झेलून
उद्दाम पणाच्या आविर्भावात
हक्क जिंकल्याच्या गर्वाने
अनेक सुरकुतलेल्या चेह-याचे
खुरटी दाढी वाढवलेले
काल रात्रीच्या  देशी दारूच्या दर्प
अजून श्वासात दरवळताना
घाम गाळणारे
अडाणी दुर्जन
पेलतात ते वजन
चार दाणे पिकवून
त्या नम्र समाजाला
चार हिरे देण्याचं

भांबावून बघतोय मी वाट
केव्हा संस्कृत- Latin मध्ये
शिव्या येतील आणि
शिवराळ भाषेत
येईल थोडी नरमाई आणि जाण ....
...ज्या दिवशी
सा-या त्वचांना येईल...
एकाच घामाची घाण !


- १८ सप्टेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा