हा ब्लॉग शोधा

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

रासायनिक गाळ


खूप वर्षांनी काल गेलो होतो गावात
गाव म्हटलं की तू...नदी...शाळाच आठवतात

आठवतो उशीरा गेल्यावर खाल्लेला मार
आधी डुंबून नदीच्या पाण्यात गार गार

नदीचं पाणीही त्याकाळी स्वच्छ असे
काठावरून चेहरा पाण्यात लख्ख दिसे

आठवतात तुझ्या फाटक्या चपला...कपडे मळलेले
फुटक्या गुडघ्या खाली मातकट डाग वाळलेले

वस्त्र गिरणीच्या संपातली तुझ्या कपाळावरची खोक
बाप रे...कसा बोलायचास...बेधडक...बिनधोक !

काल कळलं...आता असतोस मंत्रालयात
अंगरक्षकांत...तू भेटणं म्हणजे यातायात

असो...बदलला काळ...गाव ही झालं बकाल
नदीच्या पाण्यातही दिसतो रासायनिक गाळ !

- निलेश पंडित
२८ ऑक्टोबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा