हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

धांदल

आई माझी बाळखेळणी आणुन दे ना झाडाखाली
हात चिमुकले - खूप खेळणी...बघ ना माझी धांदल झाली

उशीर झाला...भरून दे ना वह्या पुस्तके दप्तरातली
बस ला दोनच मिनिटे उरली...बघ ना माझी धांदल झाली

मित्राची ही बहीण आई, गेल्या वर्षी प्रीती जडली
आज अचानक तू विचारता, माझी थोडी धांदल झाली

सुनबाईंच्या डोहाळ्यांची यादी झाली भली थोरली
कोडकौतुके...व्रतवैकल्ये...आई तुझीच धांदल झाली

नको करू तू चिंता आई, कळवत राहू सदा खुशाली
तू नसता पण परदेशी स्थायिक होताना धांदल झाली

आई....आई...

देवा...आई कुठे हरवली?.... नाही उरला कोणी वाली
पुन्हा एकदा आई दे ना...आयुष्याची धांदल झाली


- निलेश पंडित
५ ऑक्टोबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा