हा ब्लॉग शोधा

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

फासे


किती भाषणे लिहिली...केली
काही जमली, काही फसली
मख्ख चेहरे कधी पाहिले
रसिक मने ही अनेक दिसली

रंगांचाही प्रयास केला
रंगांमध्ये रंग चमकले
कधी चित्र रेखीव जन्मले
कधी कुरुप फाडून टाकले

तंबो-याच्या जुळल्या तारा
ऐकाया श्रोतेही जमले
कधी गळ्याची साथ मिळेना
कधी सर्व श्रोतेही रमले

सूर्य प्रकाशाच्या खेळाने
जीव भाबडा बधीर झाला
आमिष दिसता वैराग्याचे
खेळ टाळण्या अधीर झाला

उघडझाप ही या खेळाची
वैराग्याला तशीच ग्रासे
हे कळता मी स्तंभित झालो
गळून पडले सारे फासे

अवचित फासे गळून पडता
विश्वच हे सारे झगमगले
रंग बहरले, चित्रे जमली
तारा जुळल्या, सूर लागले !

 - निलेश पंडित
२५ सप्टेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा