हा ब्लॉग शोधा

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२

डोह


सुरुवातीला डोहामध्ये सूर मारणे आणि पोहणे जाचक वाटे
जिजीविषेने, आकांताने हात मारणे...धडपडणे वाटे उफराटे

कधी कधी मी डोह सोडुनी काठावरती निराश होउन बसून राही
खडे टाकुनी स्तब्ध जळावर वर्तुळाकृती तरंग अद् भुत गढून पाही

हळू हळू मग मी ही शिकलो सोशिकतेने चुकवित जाणे जलचर सारे
कधी उष्ण तर कधी शीत पाण्याचे फसवे दुष्ट भोवरे अडकवणारे

आता अवखळ कधी कधी लडिवाळ पणेही सूर मारुनी पोहत बसतो
थकलो आणिक फसलो तर वैतागुन थोडा विषण्णतेने मलाच हसतो

परंतु आजहि खोल मनातच एकच इच्छा सदैव जळती दडून आहे
डोह असावा सदैव शांत नि मी पोहावे निवांत संतत....अशक्य का हे ?

- निलेश पंडित
१८ ऑक्टोबर २०१२

४ टिप्पण्या:

  1. मस्तच!
    मी पण पोहायला शिकताना डोके पाण्यात घालून श्वास कोंडून नदीचे हिरवे-पिवळे पाणी पहात पडून रहायचो.. (अर्थात डबा असायचाच पाठीला)

    पाण्यात पाणी होऊन जायची अनाकलनीय ओढ असतेच असते..
    कितीतरी लोकांना गंगा-यमुनेच्या अथांग पाण्यात शरीर झोकून देण्याची इच्छा होते..
    मोठ्या धबधब्यात आपणही वाहून जावे असे वाटते..

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशयोक्ती नव्हे, पण आमच्या बॅचआधीची शिक्षणपद्धती असती तर ही कविता अभ्यासाला घेण्यासारखी झाली आहे.

    आता असे झाले आहे की आमच्या आसपासच्या बॅचमधले आयटीत न जाता येणारे लोक शिक्षक झाले आहेत, (यात आम्हीही तितकेच दोषी..)
    ज्यांना शिकताना कविता म्हणजे मार्क न मिळणारे प्रश्न इतकेच माहीत असायचे..
    आणि कसेही करून सगळ्यांना पास करायची पद्धत आली आहे.
    शिवाय तांबे, शिरवाडकर, शेळके, वैद्य, संत, सावरकर, देशपांडे, अत्रे सदृश नावांची पाठ्यपुस्तकांमधून उचलबांगडी झाली आहे ती वेगळीच.

    आमच्या मराठीच्या सरांनी ही कविता कशी अलगद उकलून दाखवली असती याचा विचार करून छानही वाटते आणि वाईटही.

    उत्तर द्याहटवा
  3. बाप रे! माझी batch तर खूपच आधीची त्यामुळे मी कुसूमाग्रजां शिवाय, अत्र्यांशिवाय, भा रा तांब्यांशिवाय पाठ्यपुस्तकाची कल्पनाच करू शकत नाही.

    "इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेउन ना नाचा" ....या करंदीकरांच्या ओळी बहुतेक

    "इतिहासाचे अवघड पैलू विसरा डोके गहाण टाका"....अशा समजल्या असाव्यात काहींना असं वाटतंय !!

    उत्तर द्याहटवा