हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

सार्थक


दिवसभराच्या त्रासिकतेत हि घामावरती घालत फुंकर

इथे तिथे मी जरा टेकतो तरी चालतो रस्ता खडतर

गाड्या जाती शेजारुन अन् चिखल उडविती त्यातच थोडा
पायवाट जर बरी लाभली तर त्या जागी फाटे जोडा

साहेबाची सदैव कटकट ...दिवसभराची खर्डेघाशी
जिथे शोधतो जरा विसावा तिथे नेमकी शिंके माशी

भले परततो कंटाळुन पण उंबरठ्याशी जरा थबकतो
स्वैपाकाचा तुझ्या हातच्या छातीमध्ये दरवळ भरतो

चिंगीचे बंड्याशी भांडण मला सुरीली सतार भासे
पाण्याने अन् धुता चेहरा, इथली दुनिया स्वर्ग होतसे

पानावरच्या दवबिंदूपरि कवेत घेतो आकाशा मी
शंभर वेळा गळा तासुनी ...सूर लावतो अखेर नामी

रिता असो वा भरला प्याला ज्याचा त्याला असे समर्पक
अवचित एका क्षणात होते उभ्या दिसाचे अखेर सार्थक

- निलेश पंडित
६ नोव्हेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा