हा ब्लॉग शोधा

रविवार, २ डिसेंबर, २०१२

नोंद

अखेर तेथे रोज थबकते...
अखेर तेथे रोज थबकते...

रंगपटाची सरता धांदल
जरा उशीरा झोपी जाते
तरी उठे ती भल्या पहाटे
नव्या उजेडी कंबर कसते

स्नान आटपे केस वाळवी
वेणी मध्ये माळे गजरा
कर्ण भूषणे पुन्हा घालुनी
रूज लावते गालास जरा

ओठांवरती चढवे लाली
हळूच भुवया रेखिव करते
लवे पापणी इथे नेमकी
अखेर येथे जरा थबकते

नजरेमध्ये भिती दाटते
काळजात होते अन् व्याकुळ
ठोका चुकतो, रोज पाहता
...डोळ्यां भवती काळे वर्तुळ

दिवसामागुन रात्र चालते
रात्रीमागुन दिवस चालतो
कवायतीच्या नियमांची या
नोंद बापडा काळ पाळतो !

- निलेश पंडित
२५ नोव्हेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा