हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२

ध्यास


जगेन मी असाच रोज गाठण्यास शंभरी
पडेल का हवे तसेच दान एकदा तरी?

तुझेच स्वप्न, तोच ध्यास, तोच नाद आजही
तुझ्या कधी जळेल का अशीच ज्योत अंतरी?

कुणी कधी न राहिले मला सखे नि सोबती
मला न खंत ती - तुझी उणीव मात्र बोचरी

नशा हवी जशी तुफान वेड लावण्या जिवा
तशीच ही तुझी नजर चलाख आणि लाजरी

दिल्या घरी सुखी रहा परंतु एकदा जरा
तनामनात वेध घे नि ऐक तीच बासरी

असो असेच 'पंडिता' महाल लाभु दे तिला
भली तुला तुझी शिळीच बाजरी नि भाकरी

- निलेश पंडित 
५ डिसेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा