हा ब्लॉग शोधा

बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

स्वातंत्र्य

(वृत्त: वसंततिलका)

देशात दुर्बल प्रजा असते इथेही
त्यांच्या मुखांवर रया नसते इथेही
मृत्यू कडेच जगणे वळते इथेही
ज्वाले समान जनता जळते इथेही

काही बलाढ्य धनिकां भरघोस माया
पोटात आग इतरां नुसते मराया
आकांत रोज असतो खळगी भराया
सत्ताच भक्षि गरिबां वसुली कराया

ती संस्कृती हरवली कुठल्या क्षणाला?
ग्रासे भयाण बुरशी भित-या मनाला
देहात ही कुजवतेच कणाकणाला
हे नागरीक पळती भिउनी रणाला !

येईल फक्त इतिहासच काय कामी...
जेव्हा असे सकल ही रचना निकामी?
का देश रुक्ष अपुरा घडला असा हा?
स्वातंत्र्य खेळ फसवा ठरला कसा हा?


 - निलेश पंडित
१५ ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा