हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१३

सुकाळ


निर्विघ्न उत्सवांचा येथे सुकाळ आहे
शिल्पांमधून सा-या देवच गहाळ आहे

मौनात राहण्याच्या जे मारती बढाया
त्यांच्याच किर्तनांचे येथे गु-हाळ आहे

राजा कशास म्हणता? शोभे "बळी"च आम्हां
लाखांत कर्ज आणिक ओसाड माळ आहे

निष्पाप मारले अन् लिहिल्या कथा नि काव्ये
एकेक वाक्य ऐका - फारच रसाळ आहे

कौरव नि पांडवांची कवने म्हणू सुखाने
हा सद्य देश अपुला त्यांचेच बाळ आहे


- निलेश पंडित
१ फेब्रुवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा