निःसुत्री त्या धबधब्यात मी
तुटक तुटक सूत्रांचे सारे
अगणित तुषार पहात असता
हृदयी माझ्या घोर निराशा
केवळ भरली
उत्क्रांतीवादाची तत्वे
विज्ञानाची अथांग क्षितिजे
कथा, पुराणे, गूढ साधना
श्रद्धा, भक्ती...उपासनाही
अपूर्ण उरली
अखेर गेलो दूर जरासा...
सुंदर मोहक संथ जलाशय
त्याच धबधब्याच्या पाण्याचा
निव्वळ तरंग ल्यालेला मज
तेव्हा दिसला
निर्मळ प्रांजळ स्वच्छ जळातच
शांत स्तब्ध मम प्रतिबिंबातच
तुषार नुरता डोह होउनी
पूर्णत्वाचा सूत्र समुच्चय
मला गवसला
- निलेश पंडित
९ फेब्रुवारी २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा