हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

चोरी


आज अचानक
तुला भेटता
तुझी खुशाली
ऐकुन माझे
बळे बळे मी
सौख्य सांगता
कथिल्याविण ही
तरुण मनांच्या
सुखस्वप्नांचा
सडा सुगंधी
अवचित पडला

भले लपव तू
मी ही लपविन...
दोघांच्याही
ओठांवरती
एक अनावर
भाव आणखी
डोळ्यांमध्ये...
(अदृश्यच पण)
खोल मनातच
थबथबलेला
फक्त मूकसा
अश्रू अडला

मनात म्हटले
जे झाले ते
बरेच झाले...
प्रवास सारा
ऊर्जा दायी
नक्षत्राविण
पार पाडता
तुझ्या कपाळी
चिरसौख्याचा
शिक्का बसला...
सोबतीतली
फरफट टळली !!

...अन् मी जेव्हा
हाती माझ्या
हात घेतला
तळहाताच्या
शुष्क त्वचेवर
खरखरीतशा
ओरखड्यांचे
जाळे लागुन
मूकपणाने
तू केलेली
तीच नेमकी
चोरी कळली...

- निलेश पंडित
२१ फेब्रुवारी २०१२

२ टिप्पण्या:

  1. एक परिपूर्ण रचना.. नेहमीप्रमाणेच..
    किती कमी शब्दात नेमक्या भावछटा रंगवल्या आहेत..
    इथे व्यक्त होणारा नायक, त्या अनुभवाचा साक्षीही आहे आणि स्वत: त्या क्षणाचा भागही आहे..
    कंसातली ओळ कंसात लिहिल्यामुळे अर्थाला किती सुंदर पदर देते आहे..
    संपूर्ण कवितेत, जे सांगायचे ते खरोखरीच शब्दांमध्ये नाहीही आणि आहेही.
    डोळ्यासमोर एक पाणावलेल्या डोळ्यांची भावुक जोडी उभी करण्यात पूर्णपणे यशस्वी कविता.

    पुन्हा एकदा, विंदांची आठवण आली ही कविता वाचताना.
    विशेषत:, "या जन्माला फुटे न भाषा.. " आठवली.

    उत्तर द्याहटवा
  2. मनापासून आभार शार्दुल. How do I thank you? Well...just thanks a million. :-)

    उत्तर द्याहटवा