हा ब्लॉग शोधा

बुधवार, १३ मार्च, २०१३

शपथ


शब्दांची किंमत । राजकारणात ।
खाली उतरत । शून्य झाली ।।

"शपथ" म्हणत । शब्द उधळत ।
कृती करतात । अनैतिक ।।

चोर ही घेतात । शपथा कित्येक ।
परंतु विवेक । त्यांत नसे ।।

असो वकिलाची । किंवा शिक्षकाची ।
गांठ शपथेची । ब्रह्म वाक्य ।।

तर्क विवेकाला । भावनेची जोड ।
शपथेची दृढ । चव तेथे ।।

आभाळ धरणी । जवळ येतात ।
तरी राहतात । दूर दूर ।।

तशीच शपथ । करी नियंत्रण ।
घालत कुंपण । मोहांनाही ।।

असावी शपथ । निःशब्द मुळात ।
पवित्र उदात्त । भाव फक्त ।।


- निलेश पंडित
४ डिसेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा