हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

प्रकाशवाट


ज्या प्रकाश वाटेसाठी तम लांछित जगलो काही
त्या वाटेवरती येता..कळले...ती उज्ज्वल नाही

अति धडपडलो सायासे अन् केल्या असंख्य क्लृप्त्या
दैनंदिन जगण्यासाठी - दैनंदिन जगण्या पुरत्या

एकेका क्लृप्ती मधुनी अंधार वाढला गहिरा
मी साद घातली ज्याला तो भासत गेला बहिरा

मग सोडुन क्लृप्त्या सा-या क्षणभर मी डोळे मिटले
कायेला पळते ठेवुन मन व्यूहातून निसटले

वहिवाटहि झगमगली अन रुणझुणला मंजुळ नाद
माझ्याच मनातुन आला त्या सादेला प्रतिसाद

तम दाटे उघड्या डोळी पण ओजस्वी जग आत
आता ना क्लृप्त्या उरल्या या दैनंदिन जगण्यात

- निलेश पंडित
१५ मार्च २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा