हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २१ मार्च, २०१३

स्वत्व


शब्दकोषांमध्ये । शब्दांचे भांडार ।
डोक्यात चकार । शब्द नाही ।।

भाव भावनांचा । कल्लोळ प्रचंड ।
मनात अखंड । चालतसे ।।

प्रश्नांचा उद्रेक । अक्राळ विक्राळ ।
सदा सर्वकाळ । मनी माजे ।।

जुन्या आठवणी । टाकतात फास ।
पुन्हा नवी आस । लावतात ।।

होता घुसमट । जीव जपण्यास ।
प्रकाश, निःश्वास । देह शोधे ।।

कुठूनशी तेव्हा । कविता जन्मते ।
त्यातून जमते । जिणे पुन्हा ।।

शब्द, भाव, श्वास । होतात मोकळे ।
जगाया आगळे । लाभे धन ।।

गमे शारदेचे । अदृश्य अस्तित्व ।
पुनरपि स्वत्व । जागविते ।।


- निलेश पंडित
१८ मार्च २०१३

२ टिप्पण्या: