हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २८ मार्च, २०१३

परमेश्वर

(वृत्त: लवंगलता)

माझ्यातून वजा करता "मी" केवळ तो उरतो
अंतर मंतरतो...त्याला मी परमेश्वर म्हणतो

सूर्य किरण होऊन सकाळी काया चेतवतो
भक्तीरस ओसंडत भैरव कानी रुणझुणतो
....उभ्या दिसाचे कोष्टक मांडुन कष्टवितो मजला....
ऊर्जा बनतो रक्ता घामा मधून सळसळतो

माध्यान्हीला पोटामध्ये वैश्वानर होतो
जिजीविषेचे जणू प्राथमिक कारण दर्शवतो
....रसरशीत रसना तृप्तीचे मोह चार देई....
पूर्णब्रह्म भासतो जसा मी कवळ वदनि घेतो

पोटासाठी घाम गाळण्या मज तो झगडवतो
दोन चार मग घोट नशेचे मंजूर हि करतो
....उफाळता सैतानी वृत्ती क्लेश चोख देई....
परिस्थिती बिघडवतो आणिक नतमस्तक करतो

संध्या समयी दिवस भराचा प्रकाश ओसरतो
डुगडुगत्या मानेला रस्ता अंतिम आढळतो
....यमपाशी ग्रासता वेदना...वाटाड्या होई....
त्याच्यावर सोपवता सारे मार्ग पार पडतो

अज्ञाताच्या नियोजनाचे माध्यम तो असतो
तर्क-चिकित्सा-अनुमानाचा पुरस्कार करतो
....अज्ञातच अन अज्ञाताचे मूर्त रूप होई....
वैज्ञानिकता विचारांत तो सदैव जागवतो

स्वस्वरुपाच्या कुरूपतेने कधी त्रस्त होतो
प्रामाणिक नास्तिकता माझी जपतो वाढवतो
...."मी-तो" अंतर टाकुन मग तो रमतो अद्वैती....
अन परमेश्वर माझ्या लेखी बाह्य जगी नुरतो !


- निलेश पंडित
२९ मार्च २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा