हा ब्लॉग शोधा

रविवार, ३१ मार्च, २०१३

वेदना

(वृत्त: कालगंगा)

बोलली नाहीस तू अन मी न काही बोललो
उष्ण झाले श्वास आणिक फक्त दोघे बहरलो

शांत होता डोह...लहरी सूक्ष्मशा होत्या जरी
ना कळे केव्हां...कसे...लाटांमध्ये फेसाळलो

स्निग्ध तू हसलीस त्याला मी दिला प्रतिसाद जो
त्यामुळे तू जाणले की मी तुझ्यावर भाळलो !

आपल्याला ज्ञात होते काय हृदयी आपल्या
वाटले लोकांस आपण भांडलो...करवादलो !

तू कुणा परक्यासवे गेलीस मार्गाने तुझ्या
पाहुनी तुज पाठमोरी मी जरा नादावलो

एकटा होतो जसा उरलो तसा मी नेहमी
सोडता तू वेदनेची साथ घेउन चाललो !

- निलेश पंडित
३१ मार्च २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा