हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ७ मार्च, २०१३

फाईल


माझ्या लोकसेवेच्या व्रतातल्या
कुठल्याशा उत्सवात
छापखान्याला द्यावा नमुना म्हणून
परवा उघडली फडताळातली ट्रंक
वर साचलेला धुळीचा
जाडजूड थर झटकून

बाहेर काढली चवड
किशोरावस्थेतल्या
कवडी मोल प्रशस्ती पत्रकांची
मी जिंकलेल्या सर्व स्पर्धांमधल्या
त्यातून पडल्या
डांबराच्या गोळ्या
अर्ध्याअधिक झिजलेल्या

...आणि जुनाट फाईल
(मी हरलेल्या स्पर्धेची !)
लाल फीत गुंडाळून
बांधून ठेवलेली

सोडून पाहिलं...
तर दरवळला
डांबराच्या गोळ्यांचा कृत्रिम सुवास
बाहेर पडले
रागात फाडलेल्या
...पत्रांचे...तुमच्या लग्नातल्या कृष्ण धवल फोटोचे
तुकडे तुकडे...
(तुझे धवल पाय आणि सतीशचं कृष्ण वदन !)
एका तुकड्यावर वाचलं..."प्रि"...
आणि एका तुकड्यावर "झीच"...

पेरून नव्या डांबराच्या गोळ्या
घट्ट बांधली लाल फीत
बरी वाटते बंद फाईल
बरा वाटतो कृत्रिम सुवास

- निलेश पंडित
१४ नोव्हेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा