हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

सोनप्रहर




ही…तीच पायरी


… हीच ती पायरी
जी चढून
उंबरठा ओलांडून
भरलं माप सांडून आत
मी आले घरात
एका सोनप्रहरी
लख्ख उन्हात
रेखीव रांगोळी पहात पहात
उन्हं प्रखर झाली
… आणि उतरली
रांगोळी विस्कटली
हळू हळू विरली

अचानक कुठूनसा
उंब-या बाहेरून
थंडसा शिडकावा आला
… आणि तो धुंदसा तुझ्या अत्तराचा दरवळ …
सोबत घेऊन तुझ्या
जुन्या मोहक रांगड्या स्पर्शाला

पायरीवर आली थोडी ओल
वाटलं साधावा
एक नवा समतोल
नाही … नाही कळलं
कधी साचलं शेवाळ
… झाली पायरी निसरडी
भरलं माप गहाळ
________________
पण आता पुन्हा फटफटलंय
झालाय सोनप्रहर पुन्हा एकदा
मी ऐकतीय आता
पक्षांचा गोड किलबिलाट
जो पूर्वी कधी ऐकला नव्हता ….


- निलेश पंडित
११ एप्रिल २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा