हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १२ एप्रिल, २०१३

महानता



खरंच सांगतो
विश्वास ठेवा
कोणत्याही संस्कृतीला
वाटावा हेवा
एवढे होते
पूर्वज महान
संस्कृती महान
ग्रंथ महान
आपल्या पिढ्या कुचकामी
आपण सारे फार लहान

काय म्हणता?
याला नाही आधार… ?
अहो - भरून वाहतंय
ग्रंथ भांडार !

काय म्हणता?
त्यांतील लिखाण नाही स्पष्ट?
साधी बाब घ्या समजून
रहस्य घ्या उमजून
मतितार्थ लावण्याचे
वाचकाने करावे लागतात कष्ट !!

काय म्हणता?
शब्दकोषा नुसार
रूढ शब्दार्थ होतात वेगळे?
अहो - इथे भावनेने
संदेश बदलतात सगळे !!

काय म्हणता?
येत नाही पटेल अशी प्रचीति?
वाढवा साधना… अन
…उपासना जरा …
आणि पुनर्जन्माची महती
ठसवून घ्या जरा चित्ती !!

काय म्हणता?
आता सारं बोलणंच खुंटलं?
खुंटलं ना?
अहो - असंच हे महत्व
पूर्वीच्या पिढ्यांना पटलं!

बघा - बोलण्याच्या नादात
कसं हरवलं तुम्हाला वादात

का घेता विनाकारण
मोठा घास तोंडी लहान!
अहो - आपले पूर्वज महान
आपली संस्कृती महान!!


- निलेश पंडित
५ ऑगस्ट २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा