हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ९ एप्रिल, २०१३

आव्हान

(वृत्त: पादाकुलक)

दीर्घ प्रवासी जागोजागी
आव्हाने मी किती पेलली !
कितेक आली कवेत माझ्या
…अनेक आणिक हवेत विरली

अभेद्य काही कातळ होते
ठिसूळ होत्या विटा हि काही
कधी मला बंदिस्त ठेवले
दिल्या कधी अन दिशाहि दाही

सुखासीनता दाटली तरी
केसहि विरले अन पांढरले
कापुरलेल्या कालक्रमाने
आयुष्याचे क्षण भुरभुरले

संपुन जंत्री आव्हानांची
मार्ग पुढे पण … ठिकाण नाही
जगावयाचे आव्हानाविण
आव्हानच हे अखेर राही !


- निलेश पंडित
१ जुलै २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा