हा ब्लॉग शोधा

शनिवार, २७ एप्रिल, २०१३

जंगल

(वृत्त: मंजुघोषा)

जंगलाचे कायदे सारे इथेही
खालती काटे नभी तारे इथेही

शांततेने, स्तब्धतेने पाहुनी मग
दांत रोवुन जीव घेणारे इथेही

पावलांशी सरपटावे फक्त ज्यांनी
त्यांत काही दंश करणारे इथेही

लोकशाही, न्याय, समता पूज्य म्हणती
आणि अपुले पाळती प्यारे इथेही

कस्तुरी अन हस्तिदंताच्या मिषाने
प्राण घेउन पोट भरणारे इथेही

टाकता तुकडे कुणी उष्ट्या शवांचे
लाज सोडुन खात जाणारे इथेही

- निलेश पंडित
२६ एप्रिल २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा