हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

गंमत

(वृत्त: उद्धव)

"मी 'मी'पण टाकित जावे"
...वाक्यातच मीपण दडले
जे प्रयत्न मी केले ते
पहिल्या टप्प्यातच अडले

तमलांच्छित वाटांवरती
तमलांच्छित मी ही झालो
सूर्योदय होण्याआधी
स्वप्नांतच पार बुडालो

मी विश्वासाने मोठ्या
पाऊल टाकले जेथे
तेथेच उत्तरांखाली
प्रश्नांचे होते काटे

मी 'मी'पण टाकुन देणे
संपूर्ण त्यागले आता
अतिसामान्याचे जगणे
भोगतो तुकवुनी माथा

अतिसामान्यत्वातच या
चेतना भव्य सळसळली
प्रश्नांच्या काट्यांमधली
जगण्याची गंमत कळली !


- निलेश पंडित
८ एप्रिल २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा