हा ब्लॉग शोधा

बुधवार, १ मे, २०१३

तफावत


सिंगापूरच्या एयरपोर्ट वर
वाट पाहताना स्फुरली
लवकरच दिसू लागणाऱ्या
कुपोषित लाचार याचक
मुलांबद्दल
प्रखर कविता 
जिने कविसुलभ समाधानातही
मीच झालो सुन्न
मनापासून
कळवळून

मुंबईला बाहेर पडून
वातानुकुलित गाडी येण्याआधी
आलं कुठूनसं
ते अनवाणी कळकट पोर
माझ्या कोपराला
एक हात लावून
पाहू लागलं आशेनं
दुसरा हात पसरून …
(कधी स्वतःच्या कपाळाला लावत
कधी पसरत)

मनावर पडली ओंगळ पाल
कुठूनशी आली घृणा
अंगभर थरारला शहारा
एका झटक्यात हललो तिथून
तो इवलासा हात
माझ्या परिटघडीच्या
शरीरापासून
निमिषार्धात झटकून

ही मना - शरीरातली तफावत
झालीय वाळवी
वाढत वाढत पोखरतीय माझं मन
आणि येतीय मला आता
माझीच शिसारी …


- निलेश पंडित
१ मे २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा