हा ब्लॉग शोधा

शनिवार, ११ मे, २०१३

बाजारपेठ

(वृत्त: शार्दूल विक्रीडित)

राष्ट्रे थोर अनेक जेथ असती....ज्यांची बडी संस्कृती
साम्राज्ये बहु दिव्य ज्यांत वसती....ज्यांसी न काही क्षिती
शेती, उद्यम, तंत्र, मंत्र, सुविधा समृद्ध सारे जरी
द्वेषातून तरीहि हाव रुजते कौटिल्य साचे उरी

सीमा, प्रांत नि धर्म-जात बनती भांडावया कारणे
आकांक्षा पण एक मुख्य असते - "संपत्ति जोपासणे"
लोकांचे गणराज्य नित्य म्हणती, काही घराणी जरी
लक्ष्मीवर्धन आपुलेच करती चाणाक्षतेने तरी

युद्धे यातुन घोर सर्व घडती, संहार बोकाळतो
विज्ञानास गुलाम देश करतो - सैतान साकारतो
दारिद्रयातच त्यांत जी पिचतसे संख्या जनांची तिथे
त्यांचे होत सदैव स्फूर्त सहजी राजी मराया जथे

ऐसा देश जिथे जिथे वसतसे ती ती कळावी दिशा
शस्त्रास्त्रे विकण्यास योग्य असती बाजारपेठा अशा !


- निलेश पंडित
११ मे २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा