हा ब्लॉग शोधा

शनिवार, ११ मे, २०१३

भांडण


(वृत्त: अनलज्वाला)

कुरूपता माझीच होतसे जेव्हा कारण
जुंपे माझ्याशीच नेमके माझे भांडण

अंतरातली सर्व शुद्धता अवचित थिजते
दांभिकतेची रसाळ भाषा जिभेत रुजते

मिळत जातसे मज पाठींबा तर्काचाही
नाट्य लपविते विचार आतिल धूर्ताचाही

"कारभार हा व्यवहाराचा असाच असतो"
- या तत्वावर माझे वर्तन मी तपासतो !

उपेक्षिताचे भोग मला पण मिळती जेव्हा
घुसमट होते माझी सारे विसरुन तेव्हा

किंवा माझी कुणी माणसे पीडित होता
मलाच येतो अतीव माझा राग तत्वता

… उघडुन मन माझ्याशी करतो मी संभाषण
जुंपे माझ्याशी माझे अन पुनःश्च भांडण


- निलेश पंडित
१२ मे २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा