हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १६ मे, २०१३

दौर्बल्य

(वृत्त: सुमंदारमाला)

कुणी एक खाई दुजा घाम गाळी कशी ही जगाची तऱ्हा आगळी !
असामान्यता, कष्ट, निष्ठा, चिकाटी … गुणांना अशा मूल्य नाही मुळी !

खरे कालचे धूमकेतू बिचारे लुळे पांगळे जीव झाले अता
कृमी कीटकादी विषाणू जिवाणू च राजे बनावे सदा … सर्वथा?

समुद्रासही शाप खारेपणाचा नि मांगल्य रात्री विके शीलही
पुन्हा बापडे पाजते दूध बाळांस वात्सल्य दाटे विषातूनही !

तुला निर्मिले अन तुला पूजिले या कृतीची चिकित्सा करावी कशी?
खुल्या बोलण्याची - खुल्या वर्तनाची कवाडेच होता पुरी नाहिशी?

अनंतासही आज दौर्बल्य ग्रासे असे राक्षसां अन धरा मोकळी
कुणी एक खाई दुजा घाम गाळी अशी ही जगाची तऱ्हा आगळी !

- निलेश पंडित
१६ मे २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा