हा ब्लॉग शोधा

शनिवार, १८ मे, २०१३

दिशा

(वृत्त: शार्दूल विक्रीडित)

दाढी शूभ्र त्वचा सतेज दिसते, स्नेहार्द्र दृष्टी असे
पायाशी रुळते सदैव कफनी हातात गीता वसे
आशीर्वाद सदैव हात दुसरा भक्तांस देण्या उभा
भाळी गंध नि चेहऱ्यात विलसे सात्वीकतेची प्रभा

भाषेची मृदुता अखंड जपणे - वैशिष्ट्य हे नेमके
व्याख्यानातहि सूक्ष्मता विविधता - पैलू किती बोलके !
व्यासंगातहि सर्व ग्रंथ अपुले… पाश्चात्त्यही … ठेवती
श्लोकांमागुन श्लोक पूर्ण म्हणती गुंगे जनांची मती

सत्संगास सुयोग्य सर्व सुविधा विस्तीर्णशी दालने
शिष्यांनाहि विशिष्ट स्पष्ट सुचना, औचित्य अन् साधणे
तेजस्वी गुरुदेव-शिष्य सगळे दैवी कथा सांगती
सारे मोघम बोलणे असुनही श्रोते सदा दंगती

स्वप्ने गोंडस पाहण्यात जनता बुद्धीस हो पारखी
देवा… यांस दिशा सुयोग्य मिळु दे काही नको आणखी !


- निलेश पंडित
१८ मे २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा