हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २४ मे, २०१३

पिशवी

(वृत्त: वनहरिणी)

देहमनाच्या पिशवीमध्ये काय काय अन किती भरावे?
खरेच का मी मुठी मुठीने नभ गिळण्याचे सोंग करावे?

सदैव झिजणे....चणे, फुटाणे आणि चुरमुरे हेच नशीबी
दोऱ्या-दोऱ्या, शिवणी शिवणी मधे साचते अभेद्य गरिबी

भले भरावी हिरे माणके विटलेपण पण मिटणे नाही
सुंभ जळाला तरी त्यातला पीळ मात्र अन सुटणे नाही

सोंग टाकले अखेर आणिक पिशवीची केली मी झोळी
खड्या स्वराने "भिक्षां देही" मारित जाताना आरोळी

मूठ रिकामी … तशीच झोळी … त्यांत कधी पण नभही मावे
नभात घेती उंच भरारी मुक्त मनाचे हिरवे रावे


- निलेश पंडित
२४ मे २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा