हा ब्लॉग शोधा

शनिवार, २५ मे, २०१३

धडपड

(वृत्त: अनलज्वाला)

कशास येती जीव स्वप्न रंगविण्यासाठी
खळी लोपते उरे कपाळावरती आठी

भूल पडे सहवासाची अन मोह साचतो
वर वर सारे शांत आतुनी द्रोह डाचतो

लाल चुटुक ओठांमागेही भूक पाशवी
रक्तमांसाने भरलेली ओंगळ पिशवी

हिंस्त्र श्वापदे पानां आडुन सळसळ करती
अंतःकरणे भरती … तडफड करून मरती

निसर्ग देतो ऊब घातही त्यातच करतो
थंडगार पाण्यातुन पायावर वळवळतो

अशा जगाला देत स्वीकृती जगणे घडते
मरण्या आधी जगून घेण्या जग धडपडते


- निलेश पंडित
२६ मे २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा