(वृत्त: पादाकुलक)
कढत्या अश्रुंसवे लाभले
बिनछत्राचे भयाण वास्तव
खोल मनाशी जिवंत राही
अजून माझे उनाड शैशव
वयात ज्या बाळसे धरावे
अनाथ झालो त्या वेळी मी
हृदयाविण मेंदूचा झाला
पोटासाठी खेळ नेहमी
शिकलो मी कौशल्ये काही -
जीव कसा वेचावा… घ्यावा…
विरक्त व्हावे नात्यांमधुनी
क्षणोक्षणी साधावा कावा
व्यर्थ भावना आप्तत्वाची
एक शेवटी भूकच सत्य
ओरबाडण्याला सुख सारे
देह टाकला गहाण नित्य
… कुणि दिसता पण बालक याचक
अवघे जगणे होते बेचव
भडभडून आठवते अवचित
अजून माझे उनाड शैशव
- निलेश पंडित
२४ एप्रिल २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा