हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १८ जून, २०१३

भडक

(वृत्त: पतितपावन)

झाली संध्याकाळ नि झाली वेळ परतण्याची
प्रकाश सरता पंख मिटवुनी तमात मुरण्याची

घाम कपाळावरचा पुसुनी सोडत निःश्वास
श्रमजीवी परतले भेटण्या मुलां माणसांस

तऱ्हेतऱ्हेचे दीप विजेचे दिपवित नगरांना
सादर करती प्रगतीच्या किति तरी छटा नाना

जागोजागी विरंगुळ्याला विविध लोक जमले
दिवसभराचा विसरुन थकवा मैफिलीत रमले

उंची सुरया होत रिकाम्या किणकिणले पेले
दुःख विझविण्यासाठी जणु मोदाने भरलेले

ती ही झाली तयार नेसुन भडक लाल साडी
संध्याकाळी तिची नेहमी गजबजते माडी

मानवतेच्या प्रगतीचे प्रतिबिंब प्रकाशात
संध्येच्या पोटात दडे पण अंधारी रात


- निलेश पंडित
१९ जून २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा