हा ब्लॉग शोधा

शनिवार, २२ जून, २०१३

ऊर्मि

सारी रात्र …
भयाण भुयारातून
चिखला - दलदलीतून
मार्ग काढून
(कुणास ठाऊक कसला!)
झिजवली थकवली गात्रं

पोहोचलो - थिजलो
अंधारलेल्या निबीड अरण्यात
सांगत समजावत
सर्वांना, स्वतःला, अंतर्मनाला
जलचरांची वळवळ
पायांवरचे वळ
न सोसणारी कळ
या सर्वांतच वसतो
मार्ग निखळ निर्मळ

कुठूनशा आलेल्या
क्रूर कोणी
होतं नव्हतं ते लुटून
दोरखंडांनी बांधून
फेकलं मला बाहेर काढून
लख्ख प्रकाशात
… अनवधानानं

रात्र आता संपली आहे
दोरखंडही सैलावत आहेत
मोकळा श्वास
निरभ्र आकाश
…….
……. तरीही ही ऊर्मि का ……
परत जाण्याची
अंधारात …. भुयारात?


- निलेश पंडित
२२ जून २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा