हा ब्लॉग शोधा

रविवार, १४ जुलै, २०१३

अबोध गाणे



(वृत्त: वनहरिणी)

अनंत पैलूं मध्ये दडे भीति ही मनाला सदैव डाचे
जिथे असावी छटा सुखाची तिथेच सावट असे भयाचे

म्हणावयाचे बरेच आहे सदाफुलीचे अबोध गाणे
अपार चिंता मनात गाते उदास ओले-सुके तराणे

कणाकणाने फुलावयाचे तसेच आहे झिजावयाचे
क्षणाक्षणाचा प्रवास … अंती क्षणात एका थिजावयाचे

जगावयाला भकासतेची विजोड छाया भले असावी
उधाणलेली परंतु आशा तिच्यासवे नेहमी वसावी

… म्हणून साकारतो तुला मी मनात माझ्या तुला वसवतो
जशी घडे पायवाट माझी मनोमनी मी तुला ठसवतो

पिढ्यापिढ्यांचा प्रवास आहे तनामनाच्या नियोजनाचा
तुझ्याच प्रतिमा जरा बदलुनी "असे-नसे" च्या विलोकनाचा!


- निलेश पंडित
१४ जुलै २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा