हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २३ जुलै, २०१३

निषेध


करितो सादर । निषेधाची ओवी
मंजूर करावी । आगळीक ॥

दुःखित झालेले । माझ्या आदर्शांना
मला पाहवेना । अजिबात ॥

सत्वयुक्त काही । मूल्ये जोपासली
परी त्यांची खिल्ली । उडविती ॥

कोळसा तो काळा । काळाच  राहता
जळात वाहता । जळ नासे ॥

जगरहाटीत । झाले तसे काही
याचा दोष नाही । कोळशाला ॥

श्लीलाश्लीलतेचे । नवीनच भान
आंबट शौकीन । पाळतात ॥

खोट्या विवेकाच्या । फ़सव्याशा वाटा
सर्वत्र बोभाटा । शुद्धतेचा ॥

नवनिर्मितीची । चालविता गादी
आईमध्ये मादी । पाहतील ॥

अशा पांडित्याचा । काय ठेवू राग
माझी मीच आग । विझवितो ॥

असो बोललो ते । आले जे मनात
उगाच छंदात । बसविले ॥


- निलेश पंडित
२३ जुलै २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा