हा ब्लॉग शोधा

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

साथ



अस्तित्वाची
हजार शकले
वेचित जगतो
थोडी थोडी
क्षणाक्षणाचे
कणाकणांचे
करीत झेले

भरीत जातो
शतदुःखांनी
सौख्यक्षणांनी
भले कडूसर
अन काटेरी
मोहक आणिक
मादक पेले

कधी लाभते
उदंड गर्दी
एकटाच मी
कधी झिंगतो

निद्रेचाही
पडता पडदा
पडद्यामागे
खेळ रंगतो

या नाट्याच्या
मंजुळ घंटा
वाजवतो का
खरेच कोणी?
कशी गूढ ही
लिहिणाऱ्याची
मुक्त लेखणी?

असो कसेही
हात तुझा मी
हाती घेतो
तेव्हा पटते
साथी मधल्या
अजब दुव्याची
अमाप महती

कडू मोह अन
क्षण सारे मग
सुख दुःखांचे
एकांतातिल
अन गर्दीतिल
सुप्त उबेने
मनात ठसती


- निलेश पंडित
४ ऑगस्ट २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा