हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

दिनार



(वृत्त: सती जलौघवेगा)

स्मृतीस माझ्या तुझ्या स्मिताची किनार आहे
तुझ्या मनी का जुन्या क्षणांचा विखार आहे?

भले म्हणावे कुणी कितीही "जुने जळावे"
जगून दाहात हासण्याचा विचार आहे

नशा नव्हे या द्रवातुनी मी तुला पहातो
जगास वाटे मला नशेचा विकार आहे

जरी महाली तुझ्या मिळेना मला निवारा
मनात खोलात फक्त माझा विहार आहे

तुला मिळाले सहस्त्र सारे हिरे नि पांचू
तुझ्या स्मृतींचा मुठीत माझ्या दिनार आहे

असेच येते सदैव स्वप्नी पुन्हा पुन्हा का
कुटीस माझ्या तुझ्याच साठी मिनार आहे?


- निलेश पंडित
१० जुलै २०१३

२ टिप्पण्या: