हा ब्लॉग शोधा

रविवार, ११ ऑगस्ट, २०१३

अदृश्य नाते

(वृत्त: इंद्रवज्रा)

कक्षेत माझ्या बहुमोल नाती
येऊन जातात कितीक वर्षे
रंगा फुलांचे सुखनैव झेले
बांधीत जातो हळुवार स्पर्शे

ज्वालाग्रही ही असती कितेक
दूरस्थ काही पण ऊब देती
स्फोटातुनीही उबदार काही
सीमीत काही मुरतात रक्ती

गुंतून जाता अवघा असा मी
माझी अहंता अतिसुप्त राही
होतो मनी मी भयभीत … जातो
वाहून संपूर्ण जणू प्रवाही

बेफाम काळा अवलोकता मी
त्यातून आता नजरेत येते
लोकांस ना जे मजला दिसे ते
माझे नि माझेच अदृश्य नाते


- निलेश पंडित
११ ऑगस्ट २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा