हा ब्लॉग शोधा

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१३

एड्स

(टीप: हे प्रातिनिधिक उदाहरण नव्हे. केवळ कवितेसाठी असलेला हा कल्पना विलास होय. एड्स केवळ स्वैरवर्तना मुळे होत नाही - त्यास इतर अनेक कारणे असू शकतात.) 
डोळे खोल त्वचा हि शुष्क पडली, आतंक देहामधे
गात्रे सारि थकून जाति सगळी मृत्यू तयां ना बधे
दुर्गंधी शरिरामध्ये पसरली कायेस पिंजारुनी
घाला त्याहि पुढे विषाणु करती सर्वत्र संचारुनी

पेशींची अवरोध शक्ति टिकण्या घेऊ किती औषधे
अन्नाची न उरे मनात मनिषा, बाधा चवीला घडे
बाह्यांगातच फक्त ना इतरही अंगात फोफावला
प्लीहा, यकृत, मूत्रपिंड, फुफुसे - सर्वांत विस्तारला

आजारात अशा समाज वरती देतो सदा डंख ही
पक्षी क्षीण मुळात होत असता कापी जणू पंख ही
चारित्र्यावर अल्प डाग पडता रुग्णा बहिष्कारिती
कुत्रा, मांजर जास्त छान जगती - प्राण्यांस गोंजारिती

मोहाचा क्षण एक काय जगलो उध्वस्त झालो पुरा
टाळावेच उनाड स्वैर जगणे हा नाद नाही बरा

- निलेश पंडित
५ जुलै २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा