हा ब्लॉग शोधा

रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

वाटा विवेकाच्या


(वृत्त: मंदाकिनी)

देहात माझ्या गूढसा कोणी अनामिक नांदतो
देई कधी अस्वस्थता, कधि बाहतो, सांभाळतो

आहे तसा माझ्यात तो जो अंतरी सामावतो
खोलात शिरतो, भांडतो, कुरवाळतो, रागावतो

वाटा विवेकाच्या मनी जेव्हा खऱ्या मी आखल्या
कित्येक अवघड जाणिवा त्याने दिल्या - मी चाखल्या

त्या जाणिवा विसरून पडता मी कधी मोही जरा
तो होतसे तत्पर नि दावी सन्मतीचा उंबरा

माझी नजर बनता उणी, अस्वच्छ वा पापी कधी
लोकां कळो वा ना कळो पकडे मला हा पारधी

वा आळसाला मी कधी देता जरासा आसरा
सरसावतो … हातात घेतो … हा मनाचा कासरा

वा भावनेपोटी कधी मी योग्य निर्णय टाळतो …
मेंदूस हृदया जोडणारा हाच सेतू जाळतो

माझ्यातला आहे परी होतो मनाचा आरसा
याच्याविना पाहू शके ना मी स्वतःला फारसा

निर्ढावलेले मन कुणाचे खंत ठेवुन जागते
याच्या कृपेने मात्र मजला झोप हुकुमी लागते !


- निलेश पंडित
१८ ऑगस्ट २०१३

२ टिप्पण्या: