हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

पताका

(वृत्त: व्योमगंगा)

लाल किल्ल्यातील साऱ्या घोषणा दमदार झाल्या
शासकांच्या सर्व खुर्च्या पण भुईला भार झाल्या

राज्यकर्त्यांच्या पिढ्यांचे वाढले ऐश्वर्य जेव्हां
नेमक्या तेव्हां हुतात्म्यांच्या पिढ्या लाचार झाल्या

पारतंत्र्याच्या झळाही सोशिल्या ज्यांनी सुखे ते
आज म्हणती, "सोसवेना … आवरा या फार झाल्या"

देशप्रेमाच्या पताका लावता जोशात आम्ही
मान खाली घालण्याच्या वेदना अनिवार झाल्या

संस्कृतीची मूलतत्वे भूर्जपत्री थोर दिसली
मात्र आता देवधर्माच्या कथा व्यापार झाल्या

"पंडिता" टाकून द्यावा हा वृथा अभिमान आता
सोनवर्खी साखळ्या आता पुऱ्या भंगार झाल्या


- निलेश पंडित
२३ ऑगस्ट २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा