हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

पार

(वृत्त: हरिभगिनी)

आता वाटे हळूच जावे कवितेच्याही पार तिथे
शब्दांवाचुन भावभावना पूर्ण असाव्या शुद्ध जिथे

जिथे असावी अंतर्मुखता अहंतेविना वसलेली
यशकीर्तीचा फोलपणा अन नाममात्रही नसलेली

रंगसुरांचा मागमूसही लोप पावुनी जेथ नुरे
उच्च नीच ना  काळे गोरे, नुरेल काही भलेबुरे

नमेल माझी कविता तेथे नमेन मी ही पूर्णपणे
मुक्तानंदा पोटी माझ्या नसेल काही उणेदुणे

पार तेथुनी पुढील रस्ता असेल सोपा उरलेला
देह्मनातिल दोष संपुनी मधुरस केवळ भरलेला


- निलेश पंडित
२४ ऑगस्ट २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा