हा ब्लॉग शोधा

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

नोंद

(वृत्त - कालगंगा)

काय देऊ संयमाची मी तुला आता हमी
पाहताना केस ओले, मोकळे अन रेशमी

का असा घायाळ होतो मी अचानक नेमका
काजळाने माखलेल्या लोचनांनी नेहमी

हाय का ना मोजती स्वप्ने कुणी विरहातली
मी तुला मग पाहण्याची नोंद होइल विक्रमी

बोट-पदराचा असा चाळा सखे नाही बरा
या तुझ्या अस्वस्थतेचा अर्थ घ्यावा काय मी

राग-रुसवा … त्यात मिसळे हासणे अवखळ तुझे
खेळ हा साधा तुला पण टाकतो मज संभ्रमी

आठवांचा भार नाही पेलणे सोपे जरी
एकटे जगण्यास त्यांची नित्य होते बेगमी


- निलेश पंडित
२५ सप्टेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा