नाही विसरता येत
जबाबदारीचा बंध
सारे आहे अस्तित्वाशी
जोडलेले एकसंध
अल्पकाल स्वप्नावस्था
देई सौख्य आणि नशा
उधळावे का आयुष्य
अनिश्चित मार्गी अशा?
उपमांच्या मिश्रणाला
शब्द्सौन्दर्याची जोड
मोघम संदिग्ध बोल
सूज्ञतेशी काडीमोड
मना पडते भुरळ
अलौकिकतेची फार
तेव्हा परजतो मीच
विवेकाची शस्त्रे चार
परी त्यातही आताशा
जीव होतो अर्धामुर्धा
अंधश्रद्धा नष्ट होते
हीच ठरे अंधश्रद्धा !
नाही नाही नाही नाही …
नाही विसरता येत
अज्ञानाच्या खांद्यावर
दिसते बुद्धीचे प्रेत
- निलेश पंडित
११ ऑक्टोबर २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा