हा ब्लॉग शोधा

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

पारखा

(वृत्त: मंदाकिनी)

अस्वस्थ तू होतोस अन् होतो तसा मी ही जरा
अस्वस्थता हाताळण्याच्या भिन्न का अपुल्या तऱ्हा?

आकाश दिसते पोकळी तुज … ते दिसे मजला निळे
स्वप्नात मी रंगून जाणे आणि तुज ना आकळे

वाटा नव्या तू शोधसी अन् शोधतो मी ही तशा
विज्ञान उत्तम मानतो मी जाणतो नूतन दिशा

मज जाचते अज्ञात जेव्हां गूढ  धोका पाहतो
मी ढाल करतो कल्पनेची टाळण्याला दाह तो

हे मान्य ना तुज … राहसी अस्वस्थ तू का सारखा?
या मोहिनीमय पण खऱ्या निद्रेस होसी पारखा?


- निलेश पंडित
१३ ऑक्टोबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा