हा ब्लॉग शोधा

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

भेकड

(वृत्त: वनहरिणी)

शिवाहून सुंदर असणाऱ्या सत्याचा घेण्यास शोध मी
स्थूल सूक्ष्म विश्वाचा अवघ्या वेध घेत राहिलो नेहमी

इतिहासाच्या सर्वांगी मज आढळली रक्तांकित पाने
रंकांना चिरडीत राहिले राव थोडके एकदिलाने

ह्या ना त्या निकषावर होती सर्व माणसे विभागलेली
हरेक मोठी संस्कृती इथे हिंसेने अन् बरबटलेली

ह्यात कसे सौंदर्य पहावे … झालो मी हतबुद्ध जरासा
मूलतत्व तेव्हा कळले मज ज्याने मजला दिला दिलासा

शब्दातीत म्हणे असतो शिव, शब्दातीतच सत्यहि असते
(सत्याच्या जरि समर्थकांना शब्दांचे भांडार गवसते!)

सत्य, शिवाची आणि जिवाची गांठ असे शब्दां पलिकडली
आता आहे मजला महती मिथ्यत्वाची पुरती कळली

स्वस्थ जगावे, झोपावे अन् घोरावे ही शांतपणाने
ऐहिक सारे असते मिथ्या - जाणुन घ्यावे सत्वगुणाने

सत्य इथे सुंदर नसते हे सुंदर सत्य मला कळले अन्
केली बंद मनाची दारे … भेकड … त्यातच दडलो पट्कन्


- निलेश पंडित
२४ नोव्हेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा