हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

चेहरे

(वृत्त - कालगंगा)

काल जे होते सभोती गांजलेले चेहरे
आज कळले तेच हे निर्ढावलेले चेहरे

पोट गेलेले खपाटीला असे सुटले कसे
आणि श्रीमंतीतही का कावलेले चेहरे

ऐकवावे नम्रतेने फक्त काही श्लोक अन्
फासुनी जाळ्यात घ्यावे गुंगलेले चेहरे

हासणे फसवे तसे ते जीवघेणे ओठही
हे नशेचा नाद वेडा लागलेले चेहरे

देवही काबीज केला कोंडला अन् मंदिरी
त्यावरी करती कमाई माजलेले चेहरे

फाडुनी 'पंडित' मुखवटे केवढा फसलास … हे 
कातडीला लेप फसवा लावलेले चेहरे


- निलेश पंडित
२८ नोव्हेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा