हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

शेवटी

(वृत्त: कालगंगा)

कैकदा भांडून झाले मीच हरतो शेवटी
त्यामुळे प्रेमात काही अर्थ उरतो शेवटी

काळवंडावी त्वचा अन् घाम गाळावा सदा
तोच संसारात माझ्या रंग भरतो शेवटी

हार सत्कारांतही बेचैन मी असतो जरा
वाहवा येता तुझी मग मी बहरतो शेवटी

राम झाले कृष्ण झाले कैक झाल्या देवता
शांतता रुजण्या मनी तुजलाच स्मरतो शेवटी

तार, मंद्र नि मध्य … सारी गायली मी सप्तके
मात्र कळले ठाम एकच षड्ज पुरतो शेवटी

'पंडिता'चे गुंतणे मक्त्यातही नाही बरे
या तुझ्या गझलेत आता मीच नुरतो शेवटी


- निलेश पंडित
४ डिसेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा